मंगळवार, २९ मार्च, २०१६

... त्याने माझे आयुष्य वाढतेय


लोक मला सहकार्य करतात. मी लोकांना सहकार्य करतो. त्याने माझे आयुष्य वाढत चालले आहे. दुसऱ्यावर अवलंबून रहायला आवडत नाही. त्यामुळे माझी धडपड सुरू आहे. अनेकांच्या अडचणी बघितल्या की माझे दुःख मी विसरून जातो. लोकांची कामे ही माझी जगण्याची प्रेरणा आहे. आजपर्यंत अनेक निराधारांना मदत केली, याचे समाधान गाठीशी आहे.

अशोक सोपान माने बोलत होते. माळशिरस तालुक्‍यातील कोथळे हे त्यांचे गाव आहे. त्यांचे वय 48 आहे. ते 70 टक्के अपंग आहेत. त्यांचे शिक्षण दहावीपर्यंत झाले आहे. त्यांना पाय नाहीत. गेल्या वर्षी एक मोठा अपघात झाला. त्या जीवावरच्या दुखण्यातून ते उठले. उपजीविकेचे साधन म्हणून इतरांना मदत करण्याची धडपड त्यांना कुठे कुठे घेऊन जाते. ते आज एका कामानिमित्त एकटेच सोलापुरात आले होते. जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागातून पिठाची गिरणी मिळविण्याचे काम होते. पण त्याआधी त्यांना काही कामे उरकून घ्यायची होती. त्यात जातपडताळणीसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनात एका मुलाचा अर्ज दाखल करण्यासाठी ते आले होते. तिथे त्यांची भेट झाली. आमच्या केत्तूरच्या पांडुरंग यांनी त्यांच्या मुलाचा जातपडताळणीचा अर्ज आला का म्हणून चौकशी करायला मला सांगितले होते. सगळ्यांचीच सगळी कामे आपल्या करता येत नाहीत, पण निदान जेवढे जमते तेवढे करावे, असा माझा प्रयत्न असतो. तिथे गेल्यावर मला माने भेटले. त्यांचा दिवस सकाळी सहाला सुरू झाला. कोथळेत महेश हरी मुळीक यांनी त्यांना उचलून एसटीत बसविले. तिथून नातेपुते आले. फलटण - अक्कलकोट एसटी पकडून सोलापुरात आले. स्टॅंडवरुन रिक्षाने आंबेडकर भवनात आले. लिफ्ट बंद असल्यामुळे सुरक्षारक्षक सुजित राठोडने त्यांना उचलून वर आणले. प्रकरणे दाखल करून घेणाऱ्या अश्‍विनी चौरे यांनी त्यांना कागदपत्रातील त्रुटी सांगितल्या. काही कागदपत्र जोडायला सांगितली. सहज चौकशी केली तर हे इतरांची प्रकरण घेऊन आलेत म्हटल्यावर माझी उत्सुकता चाळवली. मी त्यांच्याशी बोलायला सुरवात केली.

साध्या साध्या गोष्टींनी अनेक त्रस्त, वैतागलेली माणसं आपण बघतो. पण माणसाने आयुष्याकडे सकारात्मक कसे बघावे, याचे मला ते मूर्तीमंत उदाहरण वाटले. बोलायला लागल्यावर त्यांनी अनेक गोष्टी सांगितल्या. त्यांचे वडीलही 50 टक्के अपंग आहेत. आईचे वय 70 वर्ष असल्याने तीही जाग्यावर बसून आहे. थोडी शेती आहे, ती छोटा भाऊ करतो. बहिणीचे लग्न झाले. ते माळशिरस तहसील कार्यालयात लोकांना विविध दाखले मिळवून देण्यासाठी काम करतात. त्या बदल्यात वाटखर्चीचे पैसेही घेतात. त्याचे कारण ते म्हणतात, ""आता पैशाशिवाय कुठं काय काम होतात. "हात वला तर मैतर भला', नाहीतर कुणी कुणाला विचारत नाही. पण लोकांची पिळवणूक कुणी करु नये. आजच एका नायब तहसीदाराने आत्महत्या केल्याची बातमी वाचली. ते पूर्वी माळशिरसला होते. त्यांनी पैशासाठी लोकांना खूप त्रास दिला. मी लोकांकडून वाटखर्चीसाठी पैसे घेतो. लोकांचाही वेळ वाचतो. आधी काम आणि नंतर पैसे असे माझे कामाचे स्वरूप आहे. एकाच वेळी अनेकांचा कामे करत असल्याने मलाही पैसे मिळतात. गेल्या वर्षी झालेल्या एका मोठ्या अपघातातून मी वाचलो. भावाच्या मुलीची बारावी परीक्षा फलटणला होती. एसटीसाठी थांबलो असता टेंपो पायावरून गेला. माझ्याकडे काही माझी पुंजी शिल्लक होती म्हणून लगेच उपचार करता आले. 50 हजार खर्च झाला. नंतर बरा झाल्यावर पुन्हा लोकांच्या मदतीसाठी जुंपलो म्हणून बरे वाटते. दिवस जातो नाहीतर काही खरे नाही. माझेच संजय गांधी निराधार योजनेचे प्रकरण अडकले होते. त्यासाठी खूप धडपड केली. हे प्रकरण मंजूर करून घेतले पण त्यावेळी समजले की लोकांना यासाठी मदत करणे गरजेचे आहे.'' अशा अनेक गोष्टी त्यांनी सांगितल्या.
त्यांची पुढच्या कामाची वेळ होत आली. त्यांना फोन आला. तो झाल्यावर "निघतो आता. पुढचे काम महत्वाचे. ते करुन घरी जायचे आहे. बोलायचे म्हटले तर दिवसच्या दिवस पुरणार नाही,' असे सांगून त्यांनी माझा निरोप घेतला.

गेले गेले पंधरा - सोळा वर्ष हे काम करतो. आता संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना, वृद्धापकाळ योजना अशांसाठी ज्येष्ठांना मदत करण्यात एक वेगळे समाधान मिळते. ती माझी जगण्याची उमेद आहे. 
अशोक सोपान माने  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा