सोमवार, १४ मार्च, २०१६

घोषणा विरल्या, अजेंडा सुरू



पंतप्रधान नरेंद्र मोदी  मंत्रीमंडळातील मंत्री आणि सहकारी खासदारही प्रक्षुब्ध वक्‍तव्ये करत आहेत. देशभक्ती आणि देशद्रोही या वादविवादाने उभी फूट पडली आहे. सामान्य माणूस याकडे तटस्थपणे पाहतोय. घोषणा विरल्या, आता आपला अजेंडा यांनी सुरू केला, असे लोक म्हणू लागले आहेत. 

परिवर्तन, विकास आणि सुशासनाचा वादा निवडणुकीआधी नरेंद्र मोदी यांनी केला होता. त्याचा त्यांना विसर पडला आहे, असे म्हणता येत नाही पण इतक्‍या मोठ्या बहुमताने निवडणूक जिंकल्यानंतरही कॉंग्रेसला टार्गेट करुन आपला कोतेपणा दाखविण्याची एकही संधी मोदी सोडत नाहीत. त्यांनी देशातील विविध सभांत टीका केली तर समजू शकते पण परदेशातही कॉंग्रेसवर टीका करणे हे काही सभ्यतेला धरुन होत नाही. आता केवळ मोदी समर्थकच नव्हे तर त्यांच्या मंत्रीमंडळातील मंत्री आणि सहकारी खासदारही प्रक्षुब्ध आणि चुकीची वक्‍तव्ये करत 
आहेत. सरकारने प्रत्येक जातीचे, धर्माचे आणि दिनदुबळ्यांचे संरक्षण करायचे असते. पण आम्ही आमचा अजेंडा राबविणार असे भाजपचे खासदार आता खासगीत म्हणत आहेत. त्यांनी तो तसा राबविण्यास सुरवात केली आहे. मते मागताना हा अजेंडा नव्हता. देशावर दहशतवादी हल्ले होत असतील, जवान शहीद होत असतील तर पाकिस्तानशी चर्चा कसली करताय, असे मोठ्याने ओरडून प्रचारात सांगितले जात होते. आता स्वतः मोदीच पाकिस्तानचे पंतप्रधानांच्या वाढदिवसाला जाऊन बिर्याणी खाऊन येत आहेत. सैनिक शहीद व्हायचे थांबलेले नाहीत. केंद्र सरकारची आणखी कामगिरी बघायची म्हटलं तर कृषी क्षेत्रात प्रचंड निराशा आहे. त्यामुळे शेतकरी आत्महत्या करीत आहेत. निवडणुकीत मोदींनी उत्पादनखर्चावर पन्नास टक्के नफा शेतकऱ्यांना देऊ असे जाहीर केले होते. आता कुठेय काय? किमान आधारभूत किंमतीतही वाढ करण्यात आली नाही. शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासंदर्भात चर्चा करण्याऐवजी बॅंकांना कर्जमाफी दिली जात आहे. बॅंकांना बुडविणाऱ्या मोठ्या उद्योगपतींना पाठिशी घातले जात आहे. देशातील 20 शहरे स्मार्ट सिटी म्हणून विकसित केली जाणार आहेत. त्याच्यासाठी या अर्थसंकल्पात केलेली पाचशे कोटींची तरतूद पाच वर्षांसाठी केली आहे. ती काताला पुरणारी नाही.
सरकारवर भ्रष्ट्राचाराचा डाग नाही, असे म्हटले जाते. तसे असेल तर ते चांगले आहे. पण गेल्या अधिवेशनात मध्यप्रदेश आणि राजस्थानातील घोटाळ्यासंदर्भात सरकारला धारेवर धरले होते. मध्य प्रदेशातील व्यापम घोटाळ्याची व्याप्ती खूप मोठी आहे. राजस्थानानातही खाण घोटाळा उघड झाला आहे. या दोन्ही प्रकरणात सरकारने प्रतिसाद दिला नाही. विजय मल्ल्यांसारखे देशाबाहेर पळालेले ललित मोदी यांना सुषमा स्वराज यां
नी मदत केल्याचा विरोधकांचा आरोप होता. कॉंग्रेसच्या काळात जे गैरव्यवहार झाले, त्यात त्यावेळच्या सरकारने काहीना काही कारवाई केली. सुरेश कलमाडी हे कॉंग्रेसचे खासदार होते. त्यांना तुरूंगाची हवा खावी लागली. त्याशिवाय डी. राजा हे  दूरसंचार मंत्री होते. त्यांनाही तुरूंगात जावे लागले. कनिमोळी खासदार होत्या. त्यांनाही तुरूंगात जावे लागले होते. त्यामुळे मोदी सरकारविषयीची नाराजी लोक बोलू लागले आहेत.
------------------------


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा