शुक्रवार, १८ मार्च, २०१६

जेएनयुमधील देशद्रोहाचे कुभांड





जेएनयुमधील आपल्या विचारांना न मानणाऱ्या विद्यार्थ्यांना राजकीय विरोधक म्हणून देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून बळीचा बकरा बनविण्याचा भाजप सरकारने केलेला प्रयत्न फसलेला आहे. कन्हैया कुमार त्याच्या भाषणाने देशभर गाजला. उमर आणि अनिर्बन आज सुटले. भाजप सरकारने रचलेले हे देशद्रोहाचे कुंभाड त्यांना महागात पडणार असे दिसते.

दिल्लीतील जवाहरलाल नेहरु विद्यापीठा (जेएनयु)ला बदनाम करण्याचे कुभांड केंद्रातील भारतीय जनता पक्षाच्या सरकारच्या समर्थक मंडळींनी रचले असावे. त्यामुळेच केंद्रातील मंत्री, खासदार आक्रमक पद्धतीने बोलत होते. देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून दिल्लीतील विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैया कुमार, उमर खालिद आणि अनिर्बन भट्टाचार्य यांना करिअरमधून उठविण्याचा डाव खेळला गेला, पण त्याने सरकारचीच नाचक्की झाली आहे. कन्हैयाला जामीन मिळाला. त्यानंतर त्याने केलेले भाषण देशभर गाजले. त्यानंतर उमर खालिद आणि अनिर्बन भट्टाचार्य यालाही आज जामीन झाला. घोषणा देणारे विद्यार्थी विद्यापीठाबाहेरचे होते, असे चौकशी समितीने जाहीर केले आहे. आपल्या विचारांना न मानणाऱ्या विद्यार्थ्यांना राजकीय विरोधक म्हणून बळीचा बकरा बनविण्याचा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा  प्रयत्न फसलेला आहे.
जेएनयुमध्ये साधारण आठ हजार विद्यार्थी आहेत. नऊ फेब्रुवारीच्या कार्यक्रमात देशविरोधी घोषणा दिल्या, असे केंद्रातील मंत्री स्मृती इराणी यांनी संसदेत ओरडून संकेत न पाळता सांगितले. मुळातच जे कुणी देशविरोधी घोषणा देतात, त्यांना पकडायला सरकार कुचराई का करतेय. त्याचे कारण यात राजकीय डावपेचाचा भाग आहे. हा कार्यक्रम होण्यापूर्वी आरएसएसच्या पांचजन्य या मुखपत्रात जेएनयुबाबत लेख आला होता. त्यात हे विद्यापीठ सहा महिन्यांसाठी बंद करावे, असे सुब्रमण्यम स्वामी यांनी सुचविले होते.
नऊ तारखेला कार्यक्रम झाला, त्यावेळीही या विद्यापीठात बाहेरचे काही विद्यार्थी घुसले. काही टीव्ही चॅनेलचे लोक आले. विद्यापीठाला देशद्रोही, दहशतवाद्यांचा अड्‌डा म्हणून बदनाम करायचे, असे ठरलेले असावे. कारण भाजपचे आमदार विद्यापीठात इतक्‍या दारूच्या बाटल्या, इतकी सिगारेट थोटके आणि इतके निरोध सापडतात, असे निराजलेपणाने सांगत होते. कार्यक्रमाशी दहशतवाद्यांचे संबंध असल्याचे देशाचे गृहमंत्री राजनाथसिंह यांनी ट्‌विट केले. हे सगळे सामान्य माणसाच्या आकलनाबाहेरचे आहे.
भारताच्या राज्यघटनेविरोधात एकेकाळी घोषणा देणाऱ्या आसाम गण परिषद, अकाली दल यांच्याबरोबर भाजपने हातमिळावणी केली आहे. काश्‍मीरमध्ये पीडीपीशी हातमिळावणी करून सत्ता मिळविली. अफजल गुरु हा दहशतवादी होता, असे पीडीपी मानत नाही. काश्‍मीरमध्ये पीडीपी- भाजप सरकारचे मुख्यमंत्री कै. मुप्ती महंमद सईद सत्ता घेतल्यावर लगेच म्हणाले होते, की काश्‍मीरातील निवडणुका शांततेत पार पडल्या, याचे क्रेडीट फुटीरतावादी गट, पाकिस्तान आणि जनता यांना जाते. इथे भाजपशी सत्तेसाठी हातमिळावणी झाली की सगळे माफ होते. विद्यार्थ्यांनी मात्र भूक, दारिद्रय, संघवाद आणि विषमता निर्माण करणाऱ्या गोष्टींपासून आझादी म्हटले म्हणून देशद्रोहाखाली अटक हे काही बरोबर नाही. एबीव्हीपीचे विद्यार्थी "जो अफजल की बात करेगा बो अफजल मौत मरेगा' 'खून से तिलक करो, गोलियोंसे आरती' अशा घोषणा देतात. खरे तर घोषणा हिंसक आहेत. एवढेच नाही तर सरकार समर्थक हाणामारी करायलाही कमी करत नाही. कन्हैयाला कोर्टात वकिलांनी मारहाण केली. दोनदा हा हल्ला झाला. पत्रकारांनाही बडविण्यात आले. भाजप खासदार साक्षी महाराज राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची हत्या करणाऱ्या गोडसेला देशभक्त म्हटले पाहिजे, असे म्हणतात. काय चाललेय हे, असे असते का कुठे? असा विचार डोक्‍यात येतो.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा