मंगळवार, १५ मार्च, २०१६

पाणीवाल्या बाबाचा सल्ला अपुऱ्या माहितीवर


सोलापूर जिल्हा हा अवर्षणप्रवण आणि कमी पर्जन्यमानाच्या क्षेत्रात येत असला तरी उसाचे आगर झाला. त्याला उजनी धरणाचे पाणी, खात्रीशीर भाव, शेतकऱ्यांचे श्रम, कारखानदारीला सरकारचे प्रोत्साहन अशी अनेक कारणे आहेत. त्यामुळे साखर कारखाने बंद करून डाळमिल काढण्याचा जलतज्ज्ञ राजेंद्रसिंह यांनी दिलेला सल्ला अपुऱ्या माहितीवर आणि वास्तव जाणून न घेता दिला  आहे.

राजस्थानातील कामाने पाणीवाले बाबा म्हणून परिचित "मॅगेसिस' पुरस्कारविजेते राजेंद्रसिंह यांनी सोलापूर जिल्ह्यातील जलयुक्त शिवार कामांची पाहणी करून सोलापुरात पत्रकार परिषद घेतली. त्यांनी सल्ला देताना सोलापूरची स्थिती लक्षात घेतली नाही, असे दिसून येते. उजनी धरण 117 टीएमसी एवढी पाणीक्षमता असणारे आहे. महाराष्ट्रातील हा एक प्रमुख सिंचन प्रकल्प आहे. पिण्यासाठी, शेतीसाठी, औद्योगिक असे पाणीवापराचे प्राधान्यक्रम आहेत. या धरणाचे पाणी मिळाल्यामुळे उसाचे क्षेत्र वाढले. याने जिल्ह्याच्या अर्थकारणाचा कायापालट झाला आहे.
शेतकरी उसाचे पीक घेतात, कारण तो एक शाश्‍वत उत्पन्नाचा स्रोत आहे. अन्य कोणतेही पीक घेतले, तरी त्याला मिळणारा भाव हा उसापासून मिळणाऱ्या उत्पन्नाची बरोबरी करू शकत नाही. गेल्या वर्षी केळीचे उत्पन्न वाढले. दोन रुपये किलोनेही केळी व्यापारी घेईनात. परिणामी, जाग्यावर तशाच अनेक बागा सडल्या. सोलापूर जिल्ह्यातील आत्महत्यांचा विचार केला तरी ज्या भागात ऊस पिकविला जातो, त्या भागात आत्महत्या झाल्याचे आढळत नाही. कारखाने बंद केले तर त्याचे कामगार काय करणार? साखर कारखान्यांमुळे निर्माण झालेली अर्थव्यवस्था मोडीत काढणार का? असे प्रश्‍न विचारले जात आहेत.
उसाचे पीक कल्पवृक्ष आहे. त्याचा कुठलाही भाग वाया जात नाही. कारखान्यातून साखर हे जरी प्रमुख उत्पादन असले तरी सहवीजप्रकल्प, मोलॅसिस, बगॅस यांसह अनेकांतून उत्पादन मिळते. त्यामुळे एक मोठी अर्थव्यवस्था उभी राहून लोकांच्या आयुष्यात परिवर्तन झालेले आहे. पर्यावरणतज्ज्ञ मोठ्या धरणांना विरोध करतात; पण उजनीने आणलेल्या समृद्धीने तिची उपयुक्तता सिद्ध झाली आहे.
-------------------
"समन्यायी पाणीवाटप करा'
सगळे खासगी कारखाने राजकीय नेत्यांनी उभारलेले आहेत. ते कुणी काही म्हटले तरी बंद होणार नाहीत. जलतज्ज्ञ राजेंद्रसिंह जर सरकारचे सल्लागार असतील तर त्यांनी सरकारला ही गोष्ट सांगावी. एक साखर कारखाना साधारण तीन हजार लोकांना थेट रोजगार देतो. त्याची उलाढाल तीन हजार कोटींच्या घरात असते. आर्थिक विषमता दूर करण्यासाठी पाण्याचे समन्यायी वाटप झाले पाहिजे, असे कृषिरत्न आनंद कोठडिया यांनी सांगितले.
---------------------
शेतकरी ठिबककडे वळतोय
सोलापूर जिल्हा उजनी धरणामुळे सुपीक झाला. यशवंतराव चव्हाण यांचे शेतकऱ्यांना सक्षम करण्याचे स्वप्न त्यामुळे पूर्ण झाले. आता शेतकरी पाण्याचा कार्यक्षम वापर करण्यासाठी ठिबककडे वळत आहेत. भविष्यकाळात सगळा ऊस ठिबकवर येईल. साखर कारखाने टन उसाला साधारण 400 ते 500 रुपये करस्वरूपात सरकारला जमा करत असतात. सोलापूर जिल्ह्यातील कारखाने एका वर्षात 400 ते 425 कोटी कर सरकारला जमा करतात. कारखाने बंद केले तर हा सरकारचा कर बुडेल, असे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या गव्हर्निंग कौन्सिलचे सदस्य, कारखानदारीतील जाणकार आणि विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आमदार बबनराव शिंदे यांनी सांगितले. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा