शुक्रवार, २२ एप्रिल, २०१६

कोण हा कन्हैया? त्याला का इतका विरोध?


कन्हैयाकुमार मुंबईत येतोय. त्याची सभा उधळून लावण्याचा डाव एबीव्हीपीसह विविध हिंदुत्ववादी संघटनांनी आखल्याच्या बातम्या येत आहेत. तो देशद्रोही आहे, असे त्यांनी ठरवून टाकले आहे. त्याविषयी....

कन्हैया कुमार हा सध्या दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष आहे. तो कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाच्या ऑल इंडिया स्टुंड्‌स फेडरेशनचा नेता आहे. दिल्ली पोलिसांनी देशविरोधी घोषणा दिल्याच्या आरोपावरून त्याला फेब्रुवारीत अटक केली होती. पोलिसांकडे त्याच्याविरोधात पुरावा नसल्यामुळे दोन मार्च 2016 ला त्याची जामीनावर सुटका झाली. त्याची तुरुंगातून सुटका झाल्यानंतर कन्हैयाने त्याच्यावर केलेल्या आरोपाचे खंडन केले. त्यावेळी कन्हैयाने दिल्ली विद्यापीठात केलेले भाषण प्रचंड गाजले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे त्याने काढलेले वाभाडे आणि उडविलेली खिल्ली आतापर्यंत कोणत्याच नेत्याला जमली नव्हती, तितकी ती समूहा अपील झाली. त्यामुळे हिंदुत्ववादी डोके फिरले आहे. कन्हैयाचा जन्म जानेवारी 1987 मध्ये बिहारमध्ये झाला. बेगुसराई जिल्ह्यात त्याचे गाव आहे. त्याचे वडील अल्पभूधारक शेतकरी आहेत.  अर्धांगवायूचा झटका आल्याने ते अंथरुणाला खिळून असतात. त्याचा लहान भाऊ स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करतोय. आई अंगणवाडी सेविका आहे. त्याची दहावी 2002 मध्ये झाली. डाव्या विचारसरणीचा प्रभाव असलेल्या वातावरणात तो वाढला. त्यामुळे त्याची वैचारिक बैठक पक्की आहे. गोरगरीब दिनदुबळ्यांप्रती कणव आणि राज्यघटनेप्रती अपार आदर बाळगताना त्याच घटनेने दिलेल्या स्वातंत्र्याचा पुकार तो आपल्या प्रत्येक भाषणात करतो. अकरावी, बारावी विज्ञान शाखेतून केल्यानंतर त्याने भूगोल विषय घेऊन पाटण्यातून प्रथम श्रेणीत पदवी घेतली. जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या प्रवेश परीक्षेत प्रथम आल्यावर स्कूल ऑफ इंटरनॅशनल स्टडीजमध्ये तो आता पीएचडी करीत आहे. गेल्या सप्टेंबर 2015 मध्ये झालेल्या निवडणुकीत सगळ्या विद्यार्थी संघटनांवर मात करीत कन्हैया जेएनयूच्या विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष झाला. निवडणुकीत शेवटच्या दिवशी विद्यापीठात त्याने केलेल्या भाषणाने त्याला विजय मिळवून दिला, असे त्याचे मित्र सांगतात.
देशद्रोहाच्या गुन्ह्यातून अटक झाल्यानंतर जेव्हा तो जेलमधून सुटला त्या रात्री त्याने केलेले भाषण गाजले. अनेक वाहिन्यांनी हे भाषण लाइव्ह कव्हर केले. भारतापासून नव्हे तर भारतात स्वातंत्र्य हवे, अशी भूमिका मांडत त्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघापासून देश मुक्त करा, असे आवाहन केले. संघ देशाला तोडण्याचे काम करीत आहे, ही भूमिका तो मांडतोय, आणि हे खरे एबीव्हीपी, भाजप आणि त्या सगळ्या परिवाराचे दुखणे आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला हा देश हिंदू राष्ट्र करायचा आहे. त्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या क्‍ल्युप्त्या लढविल्या आहेत, त्यात लव्ह जिहाद, घरवापसी, गोहत्या अशी वेगवेगळी हत्यारे त्यांनी बाहेर काढून वापरली. ही सगळी हत्यारे वापरताना त्यांना मिळणारा पाठिंबा अत्यंत तोकडा होता. त्यामुळे त्यांनी देशभक्तीचे हत्यार आता उपसले आहे. आपल्या विरोधातल्या लोकांना देशद्रोही ठरविताना या देशाची विविधतेची वीण आपण विस्कटून टाकतोय, याचे भान त्यांना नाही. त्यामुळे माथेफिरू कन्हैयाला मारण्यासाठी विविध प्रकारची बक्षीस जाहीर केली आहे. जिथे जाईल तिथे त्याला ते विरोध करीत आहेत. पण लक्षात ठेवा कन्हैया या देशाला खाऊ घालणाऱ्या शेतकऱ्याचे पोरग आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांकडे तुम्ही बघत नाही. जे दिनदुबळ्यांचा आवाज उठवतात, त्यांना मारण्याचे प्लॅनिंग करताय, हे काही चांगल नाही.
--------------------------