बुधवार, १६ मार्च, २०१६

ऊस ः कमी पाण्यात जास्त उत्पन्न

अंकोलतील वॉटर बॅंकेच्या परिसरात अरुण देशपांडे आणि त्यांच्या पत्नी सुमंगला देशपांडे.  

"व्हर्च्युअल कंटेंट ऑफ वॉटर' म्हणजे एखाद्या वस्तुसाठी लागणाऱ्या पाण्याचा हिशोब मांडला तर उसासाठी जादा पाणी लागते म्हणून दिला जाणारा दोष निराधार आहे. उसापासून कमी पाण्यात जास्त उत्पन्न मिळते, हे सिद्ध झालेले आहे. त्यामुळे साखर कारखाने बंद करून डाळ मिल सुरू करा म्हणणे अयोग्य असल्याचे पाण्याचे अभ्यासक अंकोलीतील (ता. मोहोळ) प्रयोग परिवाराचे प्रमुख आणि शास्त्रज्ञ अरुण देशपांडे यांनी सांगितले. त्यांनी मांडलेली मते.....
------------------
राजस्थानात पाणीवाले बाबा म्हणून परिचित असलेल्या मॅगेसिस पुरस्कार विजेचे राजेंद्रसिंह यांचा सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखाने बंद करून दाळमील सुरू करा, हा सल्ला अपुऱ्या माहितीच्या आधारावर असल्याचे प्रसिद्ध झाल्यानंतर अंकोलीतील (ता. मोहोळ) प्रयोग परिवाराचे प्रमुख आणि शास्त्रज्ञ अरुण देशपांडे यांनी सकाळीच फोन केला. त्यांनी उसाविषयी फार मोलाची माहिती दिली. ऊसपीक सोलापूर जिल्ह्यासाठी घातक आहे, असा सल्ला जलतज्ज्ञ राजेंद्रसिंह यांनी दिला आहे. हा सल्ला अपुऱ्या माहितीवर असल्याचे "सकाळ'ने मांडले. त्याचे अनेकांनी स्वागत केले. ही भूमिका अयोग्य आहे, असे कुणी म्हटले नाही. त्यात देशपांडे यांचे मत मला फार महत्वाचे वाटले.
अरुण देशपांडे म्हणाले, ""जागतिक पातळीवर पाण्याचा 2008 आणि 2013 जो अभ्यास झाला आणि चालू आहे, त्याच्याशी आपल्या जलतज्ज्ञांचा संपर्क नसल्याचे दिसते. त्यामुळे पाणी व्यवस्थापनाच्या क्षेत्रात अनेक अंधश्रद्धा, गैरसमजुती, जलनिरक्षता आहे. व्हर्च्युअल कंटेंट ऑफ वॉटर म्हणजे एखाद्या वस्तुसाठी लागणाऱ्या पाण्याचा हिशोब मांडला तर उसासाठी जादा पाणी लागते म्हणून दिला जाणारा दोष निराधार आहे. उसापासून कमी पाण्यात जास्त उत्पन्न मिळते, हे सिद्ध झालेले आहे. ज्वारी उत्पादन करून एक रुपया मिळवायचा म्हटले तर त्याला सतराशे लिटर पाणी लागते. उसासाठी तेच पाणी केवळ साडे सातशे लिटर लागते. एक लिटर दुधासाठी तीन हजार लिटर पाणी लागते. हे अभ्यासाने सिद्ध झालेले आहे. ऊसउत्पादक शेतकरी वेडे नाहीत. उसाच्या वजनाच्या 25 टक्के चारा उपलब्ध होतो.''

शहरी हपापा संस्कृती
पाण्याचा वॉटर फुट प्रिंट या पद्धतीने अभ्यास केला तर भारत हा पाण्याचा सर्वांत मोठा निर्यातदार देश आहे, असे सांगून देशपांडे म्हणाले, ""एक लिटर पेट्रोलसाठी पन्नास हजार लिटर पाणी आपल्याला निर्यात करावे लागते. ते आपण मटण, अंडी, दूध, फळभाज्या, तांदूळ गहू या माध्यमातून पाठवितो. पेट्रोलियम पदार्थ वापरणारी माणसं हे पाने पितात. पाणी जास्त लागते असे म्हणून ऊस पीक आणि तो पिकविणारे शेतकरी यांना आपण जबाबदार धरणे चुकीचे आहे. प्रत्येकाला लागणारे पाणी याचा अभ्यास जर आपण केला आता ग्रामीण भागाकडून पाणी शहराकडे वहात असल्याचे आपल्याला दिसून येईल. शहरी हपापा संस्कृतीची तहान अशीच राहिली तर परमेश्‍वर आला तरी ती भागवू शकणार नाही. त्यामुळे आपल्याला महात्मा गांधी यांनी सांगितलेल्या मार्गानेच जावे लागेल. पाणी शहराकडे जाऊ न देता ते आपल्या खेड्यात थांबविणे ही आजची गरज आहे. खेडी स्वयंपूर्ण झाली पाहिजेत. त्याशिवाय आपण समाजाला स्वस्थ लाभणार नाही. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा