कोण पुढे चाललंय? का?
लोकसभा निवडणुकीच्या वेळी राज्यघटना बदलणार हे फेक नॅरेटीव्ह तयार केले आणि त्या जोरावरती महाविकास आघाडीने महाराष्ट्रात जास्त जागा जिंकल्या, असा दावा महायुतीचे नेते निवडणुकीनंतर करत होते. प्रत्यक्षात मात्र राज्यघटना बदलाच्या पलीकडे अनेक मुद्दे लोकांच्या डोक्यात होते. त्यात ईडी, सीबीआय, इनकम टॅक्स या संस्थाचा वापर करून भाजपने इतर पक्षाच्या लोकांना त्रास देणे, पैशाच्या जोरावरती पक्ष फोडणे, फोडलेल्या पक्षांनाच खरे पक्ष म्हणून निवडणूक आयोगाने मान्यता देणे, पक्षाच्या संस्थापकांकडून पक्षाबरोबर चिन्ह हिसकावून घेणे हे सगळे लोक जाणून होते. त्याशिवाय शेतकऱ्यांमध्ये मोठी नाराजी होती. खरंतर हे मुद्दे लोक विसरायला लागलेे होते. महाविकास आघाडीने दिलेल्या उमेदवाऱ्या, कार्यकर्त्यांना डावलणे, घराणेशाही या आणि इतर काही मुद्दयांमुळे मतदार काही प्रमाणात कन्फ्युजमध्ये होता. त्याशिवाय मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी सातत्याने केलेल्या टिकेनंतर देवेंद्र फडणवीस यांच्या विषयीची सहानुभूती एका वर्गामध्ये वाढू लागली होती. पण आता वातावरण तापत असताना काही घटना बघितल्या तर डाव महायुतीच्या विरोधात पडू लागलेत असे दिसतेय. उदाहरणार्थ : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आर. आर. पाटील यांच्यावर केलेला आरोप म्हणजे लोकसभेला चंद्रकांत पाटील यांनी आम्हाला बारामतीमध्ये शरद पवार यांचा पराभव करायचा आहे, असे बोलण्यासारखा आहे.
दुसरी गोष्ट म्हणजे मुंबई काँग्रेसचे नेते रवी राजा यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आहे. त्यांचं स्वागत देवेंद्र फडणवीस यांनी केले. यावर प्रतिक्रिया देताना खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या की रवी राजा यांना कोणती नोटीस मिळाली आहे, हे त्यांनी सांगावे. सीबीआय, ईडी, इन्कम टॅक्स या गोष्टी लोकांच्या डोक्यातून जात असताना पुन्हा एकदा त्याची खपली आपोआपच उचकटली. लोकसभा निवडणुकीच्या वेळी विठ्ठल कारखान्याला नोटीस पाठवून चेअरमन अभिजीत पाटील यांना बळजबरीने भाजपाला सहकार्य करण्याची भूमिका घ्यायला लावली. त्याचा परिणाम असा झाला की लोकांनी काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांना तिथे चांगलीच साथ दिली. त्या विजयी झाल्या.
एखाद्या माणसाला प्रवेश देऊन एखादी जागा वाढू शकते. पण त्यातून राज्यभर जाणारा मेसेज हा अनेक जागांवर परिणाम करत असतो.
तिसरी बाब सध्या केवळ एक आमदार इतकं बळ असलेल्या राज ठाकरे यांना त्यांच्या मुलासाठी एक जागा महायुतीने सोडायला हवी, असं देवेंद्र फडणवीस बोलले. पण आपण केवळ एका जागेचा वादा करून राज ठाकरे यांचे अवमूल्यन करतोय. मनसे कार्यकर्त्यांना त्यांचा नेता केवळ आपल्या मुलाची जागा कशी निवडून येईल, हे पाहतोय असा मेसेज त्यातून गेला.
लोकसभा निवडणुकीच्या वेळी राज ठाकरे यांनी आपला एकही उमेदवार न उभा करता भाजपाला पाठिंबा दिला होता. राज ठाकरे यांनी एक घोषणा केली आहे, ती म्हणजे या निवडणुकीनंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे शिवसेना त्यांना पाठिंबा देणार नाही. दुसरीही बाब राज ठाकरे बोलले ती म्हणजे शिंदे यांनी शिवसेना पक्ष आणि आणि चिन्ह या दोन्ही गोष्टी घेणे चुकीचे होते. त्याने राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटीच्या घटना ताज्या झाल्या आहेत.
राज ठाकरे यांना फडणवीस मुख्यमंत्री होणार हे कसं कळाले? ईव्हीएमबाबत लोकांच्या डोक्यात कन्फ्युजन आहेच. परवा प्रवासात एक मंगळवेढा तालुक्यातील जंगलगीचा शेतकरी लईच ठामपणे सांगत होता, ईव्हीएममध्ये काही गोंधळ नसला तर महाविकास आघाडी निवडून येणार. मला कळेना इतका कसा तो ठाम बोलतोय. त्याने बोलले एक वाक्य मात्र मला प्रभावित करुन गेले. मतदान कुणाला करायचे? तो म्हणाला, जातीला नाय, नितीला मतदान करायचे. जात जाणिवा प्रखर होत असतानाच्या कालखंडात मला लय आवडला चौथी शिकलेला, कन्नड प्रभावाची मराठी बोलणारा, अनुभवाने आलेला शहाणपणा सांगणारा तो शेतकरी.....




